Wednesday, March 9, 2011

मित्रराष्ट्र म्हणून अमेरिकेचे मूल्यमापन


१९६५ साली जेंव्हा भारत-पाकिस्तान युद्ध झाले,
त्या युद्धाच्या दरम्यान लक्षात आले कीं पाकिस्तानने जरी स्वतःला अमेरिकेच्या
गोठ्यात बांधून घेतले असले तरी त्यांना अमेरिकेचा पाठिंबा मनापासून मिळत होता असे
वाटत नव्हते. अमेरिकेचे पाकिस्तानला दिलेले समर्थन कांहींसे बिचकत-बिचकतच वाटायचे!
अमेरिकेकडून मिळालेली शस्त्रे केवळ साम्यवादाविरुद्धच्या लढाईसाठी पाकिस्तानला
दिली गेली होती आणि ती भारताविरुद्ध वापरायला बंदी हे त्यातलेच एक कलम होते! या उलट
पाकिस्तानला शस्त्रे हवी होती फक्त भारताविरुद्ध वापरण्यासाठीच व त्यामुळे इथे
"परस्पर हितसंबंधांतील संघर्ष" (conflict of interest) स्पष्ट दिसत होता. त्यात
दोघांचीही कोंडी व्हायची.

अमेरिकेच्या दुटप्पी वागण्याने पाकिस्तानचे त्यावेळचे परराष्ट्रमंत्री झुल्फिकार
अली भुत्तो संतापले व १९६५ च्या पराजयानंतर आणि ताश्कंदच्या मानहानीकारक करारानंतर
त्यांनी पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अयूब खान यांच्यावर टीका करत
परराष्ट्रमंत्रीपदाचा राजीनामा दिला. पुढे ते स्वत:च आधी पाकिस्तानचे
राष्ट्राध्यक्ष व नंतर पंतप्रधान झाले. भारताने अण्वस्त्राची पहिली चांचणी केली
त्यानंतर भुत्तोंनी अमेरिकेकडून अण्वस्त्रविरोधी ’सुरक्षा-छत्र’ मिळविण्याचे खूप
प्रयत्न केले पण अमेरिकेने दाद दिली नाहीं. त्यामुळे त्यांनी अमेरिका हे एक
विश्वासार्ह मित्रराष्ट्र नाहीं असा निष्कर्ष काढून चीनबरोबरचे संबंध घनिष्ट करायला
सुरुवात केली. पुढे पाकिस्तानला अण्वस्त्रधारी बनविण्यात अमेरिकेइतकीच चीनचीही मदत
झाली.[१]

अमेरिकेचे धोरण असे दिसते कीं जे हुकूमशहा ताटाखालच्या मांजरासारखे त्यांच्या
तालावर नाचतात त्यांना आर्थिक आणि लष्करी मदत द्यायची आणि आपल्याच जनतेवर करीत
असलेल्या त्यांच्या अन्यायांकडे दुर्लक्ष करायचे. पण या अन्यायांमुळे संतापलेली
जनता जेंव्हां बंड करून तख्तापालट करायला उठाव करायची तेंव्हां आपण लोकशाही राष्ट्र
असल्याचा आव आणून आपल्याच मित्राला (’पित्त्या’ला) उपदेशामृत पाजत पाजत वार्‍यावर
सोडून द्यायचे व नव्या राज्यकर्त्याशी जुळवून घ्यायला पहायचे!

बांगलादेशच्या युद्धातही पाकिस्तानला अमेरिकेच्या अवसानघातकी धोरणाचा प्रत्यय आला
होता. पाकिस्तानचा दारुण पराभव होणार हे स्पष्ट दिसत असतानासुद्धा आपले सातवे आरमार
बंगालच्या उपसागरात पाठवायच्या निर्णयाला अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष निक्सन
यांनी खूपच उशीर केला. याउलट पूर्व पाकिस्तानविरुद्धची मोहीम इंदिरा गांधींनी
इतक्या कार्यक्षमतेने, झपाट्याने आणि तालबद्ध पावले टाकून पार पाडली कीं सातवे
आरमार जागेवर पोचायच्या आतच पूर्व पाकिस्तानचा ’खेळ खलास’ झाला होता. पाकिस्तानी
राज्यकर्त्यांना हा घाव फारच जिव्हारी लागला होता व त्यातून अमेरिकेची "एक
बेभरवशाचा मित्र" अशीच प्रतिमा पाकिस्तानी सरकारात आणि जनतेत निर्माण झाली व ती मला
आजतागायत दिसते. आज अशी परिस्थिती आहे कीं पाकिस्तानी राज्यकर्त्यांना अमेरिकेचे
पैसे प्यारे आहेत आणि हा ना तो बागुलबोवा दाखवून त्यांच्याकडून पैसे घेणे त्यांना
अजीबात वर्ज्य नाहीं, पण पाकिस्तानी जनतेत अमेरिकेबद्दल आस्थेची किंवा कृतज्ञतेची
भावना अजीबात नाहीं. उलट एक तर्‍हेचा द्वेषच आहे.

१९७१ ते १९७८ पर्यंतच्या काळात अनेक घडामोडी झाल्या. त्यात भुत्तोंना दिलेली फाशी
ही एक महत्वाची घटना होती. त्यावेळी अमेरिकेने भुत्तोंना वाचवायचे जे प्रयत्न केले
तेही थातुर-मातुरच (half-hearted) होते. झिया नवे राष्ट्राध्यक्ष झाले तरी
अमेरिकेने त्यांना जवळ-जवळ वाळीतच टाकले होते. पण अफगाणिस्तानवर सोवियेत
संघराज्याचे आक्रमण झाल्यावर मात्र रातोरात परिस्थिती बदलली. इराण आणि इतर तेल
उत्पादक आखाती राष्ट्रे रशियाच्या घशात पडण्याच्या शक्यतेने अमेरिकेला पाकिस्तानची
आठवण झाली. तत्कालीन राष्ट्राध्यक्ष कार्टर यांनी परत पाकिस्तानला थोडी-फार शस्त्रे
देण्याचे अमीष दाखवून युद्धात ओढण्याचा प्रयत्न केला पण झिया चांगलेच धूर्त निघाले.
त्यांनी अमेरिकेला ठणकावून सांगितले कीं अमेरिकेने "आपण विश्वासू मित्रराष्ट्र
आहोत" हे आधी सिद्ध करावे, तरच ते पुढे चर्चा करतील.[१] कार्टर यांनी पाकिस्तानला
देऊ केलेल्या मदतीची "peanuts" या शब्दात संभावना करून [२] त्यांनी कार्टरना
भेटण्यासाठी "व्हाईट हाऊस"ला जाण्याबद्दल अनुत्साह दाखविला. तोपर्यंत कार्टर
निवडणूक हरणार हेही स्पष्ट झाले होते.

रेगन आल्यावर मात्र चित्र पालटले व रेगननी पाकिस्तानला "तुम्ही सोवियेत संघराज्याचा
समाचार घ्या आम्ही तुमच्या अणूबाँब बनविण्याच्या पयत्नांकडे पाहून न पाहिल्यासारखे
करू" असे वचन दिले. रशियाविरुद्धच्या या युद्धात ओसामा बिन लादेन अमेरिकेच्या
बाजूने लढले.

रेगन यांची कारकीर्द संपता संपता दोन मोठ्या घटना घडल्या. पाकिस्तान अण्वस्त्रधारी
झाले ही पहिली घटना आणि अमेरिकेने वार्‍यावर सोडून दिल्यामुळे संतापलेले ओसामा बिन
लादेन अमेरिकेचे कट्टर शत्रू बनले ही दुसरी. आज अमेरिका या दोन्ही घटनांमुळे नक्कीच
पस्तावत असेल! पण अमेरिकेची पाकिस्तानला वार्‍यावर सोडण्याची ही कृती त्यांच्या
नेहमीच्या "कामापुरता मामा" या मूलभूत धोरणाला धरूनच होती व या धोरणाचा अमेरिकेने
केलेला उपयोग बर्‍याच इतर ठिकाणीही दिसून येतो.

या आधी अमेरिकेने असेच इराणच्या शहांनाही वार्‍यावर सोडले होते. इराणचे शहा
अमेरिकेचे खंदे पुरस्कर्ते होते. शहांनी जी मनमानी इराणमध्ये केली ती कांहीं
प्रमाणात तरी अमेरिकेच्या समर्थनाच्या बळावरच होती. पण या मनमानीमुळे त्यांची
लोकप्रियता घटल्यावर अमेरिकेने त्यांच्याशी जी परकेपणाची वर्तणूक केली त्याला तोडच
नाहीं. एक तर त्यांना अमेरिकेने भरीव समर्थन दिले नाहीं व त्याचा परिणाम म्हणून
शेवटी त्यांना जेंव्हां देश सोडावा लागला तेंव्हां आपुलकीने राजाश्रय देण्यात
मागे-पुढे केल्याने शहा आधी इजिप्त, मोरोक्को, मेक्सिको असे हिंडत राहिले व मग
शेवटी कर्करोगाने आजारी पडले. त्यावरील शस्त्रक्रिया करून घेण्यासाठी ते अमेरिकेत
खोट्या नावाने दाखल झाले. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांना सोडून
आपल्या हवाली करावे अशी मागणी आयातुल्ला खोमेनींच्या सरकारने केली पण असे न करता
शहांना पुन्हा अमेरिका सोडण्यास सांगण्यात आले. कदाचित या कृत्यामुळेच इराणने
अमेरिकेच्या मुत्सद्द्यांना ओलीस म्हणून धरून ठेवले व शहा तिथून बाहेर पडले तरीही
त्यांना सोडले नाहीं. एके काळचा अमेरिकेचा खंदा पुरस्कर्ता असलेल्या आणि मयूर
सिंहासनावर बसणार्‍या या सम्राटाने शेवटी एकाद्या निर्वासितासारखा एका देशातून
दुसर्‍या देशात फिरत-फिरत शेवटी इजिप्तमध्ये देह ठेवला. त्यांचा शाही इतमानाने
दफनविधीही सादात यांनीच केला!

असाच प्रसंग नंतर अमेरिकेने मार्कोस या फिलिपाइन्सच्या तत्कालीन
राष्ट्राध्यक्षांवरसुद्धा आणला. त्यांची सद्दी संपल्याबरोबर अमेरिकेने त्यांनाही
आधी मनीलातून उचलून अमेरिकेला आणले. पण नंतर मात्र त्यांना एखाद्या पोतेर्‍यासारखे
फेकून दिले. शेवटी तेही असेच निर्वासितासारखे अमेरिकेतल्या एका शहरातून दुसर्‍या
शहरात फिरत-फिरत शेवटी हवाई बेटावर कालवश झाले.

इंडोनेशियाचे भूतपूर्व राष्ट्राध्यक्ष सुहार्तोंनासुद्धा असाच अनुभव आला.
साम्यवादाचे कट्टर विरोधक म्हणून एके काळी अमेरिकेच्या गळ्यातला ताईत असलेल्या
सुहार्तोंना त्याची सद्दी संपल्यावर अमेरिकेने वार्‍यावरच सोडले. फरक इतकाच कीं
सुहार्तो स्वतःच्या देशात बरेच लोकप्रिय होते आणि त्यांची ताकत केवळ सिंहासनावर
अवलंबून नव्हती. त्यामुळे ते जकार्तातच राहिले व वार्धक्याने दोन-एक वर्षांपूर्वी
निवर्तले. पण अमेरिकेने त्यांनाही हवे तेंव्हा आणि हवे तितके समर्थन दिले नाहीं हे
नक्कीच.

अमेरिकेच्या अवसानघातकी धोरणाचा फटका मुशर्रफ यांना व बेनझीरबाईंनाही बसला. एके
काळी मुशर्रफना अमेरिकेने अस्पृश्यासारखेच वागविले . इतके कीं एका पत्रकार परिषदेत
धाकल्या बुशना मुशर्रफ यांचे नांवही आठवले नाहीं.[१] पण ९/११च्या हल्ल्यानंतर मात्र
ते रातो-रात War on terror मधले (धाकल्या) बुशसाहेबांचे लाडके मित्रच बनले! पण
त्यांची उपयुक्तता संपल्याबरोबर त्यांच्यामागेही अमेरिकेने लोकशाही आणण्याचा तगादा
लावला. त्यांच्यावर बेनझीरबाई अक्षरशः लादल्या गेल्या.[१] पण त्यांची हत्त्या
झाल्यावर जेंव्हां निवडणुकीत मुशर्रफ यांचे पानीपत झाले तेंव्हां मुशर्रफनाही
अमेरिकेने वार्‍यावर सोडले. आता (सत्ताभ्रष्ट झालेल्या पाकिस्तानच्या इतर
नेत्यांप्रमाणेच) मुशर्रफसाहेबही सध्या लंडनमध्ये स्वघोषित हद्दपारीची मजा लुटत
आहेत.

अमेरिकेच्या अवसानघाताचे अगदी अलीकडील उदाहरण म्हणजे इजिप्तच्या मुबारक यांचे.
अन्वर सादात यांच्या नेतृत्वाखाली इस्रायलला मान्यता देणारे इजिप्त हे पहिले अरबी
राष्ट्र होते. सादात यांची हत्त्या झाल्यावर इजिप्तच्या ’योम किपुर’ युद्धात हवाई
दलात खूप पराक्रम गाजविलेले सुप्रसिद्ध फायटर पायलट होस्नी मुबारक त्यांच्या जागी
आले. आजवर इस्रायलशी मैत्रीचा करार केलेले व ’योम किपुर’ युद्धानंतर इस्रायलशी
पुन्हा युद्ध न केलेले इजिप्त हे पहिले राष्ट्र होते. अमेरिकेचा इजिप्तकडील आर्थिक
व लष्करी मदतीचा ओघ चालूच होता. पण मुबारक यांची लोकप्रियता घटल्याबरोबर अमेरिकेने
त्यांनाही राजकीय सुधारणा करण्याचे बोधामृत पाजण्यास सुरुवात केली. ते पडल्यावर
आलेल्या (कदाचित् तात्पुरत्या) नव्या लष्करी राजवटीलाही अमेरिकेचा जो संदेश गेला
त्यात पूर्वीचे सर्व करार (म्हणजे इस्रायल बरोबरचा मैत्रीचा करार) नव्या सरकारने
बदलू नयेत अशी अटही घातली आहे.

सध्या अमेरिकेने तेच टुमणे बहरीनच्या राजांच्यामागे लावले आहे. येमेनमध्येही तेच
होईल अशी लक्षणे दिसत आहेत. मग शेवटी अमेरिकेशी मैत्रीचा करार कोण आणि कशाला करेल?
अमेरिका स्वतःचा फायदा कशात आहे एवढेच व्यवहारीपणे पहाते. न्याय, लोकशाही हे शब्द
सोयिस्करपणे वापरते. समर्थन दिलेल्या लष्करशहांचा ती उपयोग करून घेते तर
लष्करशहांना अमेरिका आपल्याला वापरते आहे हे माहितही असते आणि मान्यही! तेही पण
अमेरिकेचा तसाच वापर करतात.

याचे उत्तम उदाहरण म्हणजे पाकिस्तान. पाकिस्तान सरकारला माहीत आहे कीं जो वर
अमेरिकेला आणि इतर पाश्चात्य राष्ट्रांना अफगाणिस्तानला मदत पोचती करायची आहे तो वर
(आज तरी) कराची-पेशावर-खैबर खिंड याखेरीज दुसरा कुठलाच सोयीचा रस्ता नाहीं
(corridor) व त्यामूळे पाकिस्तानने अमेरिकेची "धरले तर चावते आणि सोडले तर पळते"
अशी अवस्था करून टाकली आहे. जोपर्यंत अमेरिका आणि इतर युरोपीय राष्ट्रे
तुर्कमेनिस्तान, उझबेकिस्तान आणि ताजिकिस्तान या देशांबरोबर संगनमत करून तसेच
तुर्कस्तान-काळा समुद्र (Black Sea)-अर्मेनिया-अझरबाईजान-कॅस्पियन
समुद्र-तुर्कमेनिस्तान-अफगाणिस्तान असा नवा मार्ग तयार करत नाहीं तोपर्यंत
पाकिस्तान आपल्या भौगोलिक स्थानाचा (दुरु)पयोग करतच रहाणार यात शंका नाहीं.

आतापर्यंत अमेरिकेची पक्की मैत्री फक्त इंग्लंड आणि इस्रायल या दोन राष्ट्रांबरोबरच
आहे. पण या दोघांना तर गमतीने अमेरिकेची ५१वे व ५२वे ’राज्य’च समजण्यात येते!

अलीकडील घटना पहाता अमेरिका भारताशी मैत्री करू इच्छिते आहे असे चित्र दिसत आहे.
क्लिंटन यांच्या कारकीर्दीत याला सुरुवात झाली होती पण त्यांच्या कारकीर्दीत ’नारळ
फोडण्या’पलीकडे फारशी प्रगती झाली नव्हती. धाकल्या बुश यांच्या कारकीर्दीत या
धोरणाला कांहींसा वेग आला व अणू ऊर्जा करार होण्यात त्याची परिणती झाली. आता
ओबामांच्या कारकीर्दीत मैत्री वाढण्याच्या दिशेने खूपच नवी-नवी पावले टाकली जात
असलेली दिसत आहेत. मनमोहन सिंग यांच्या अमेरिका भेटीत त्यांना ओबामांच्या तर्फे
’शाही मेजवानी’ (State dinner) दिली गेली. राष्ट्रपती म्हणून ’व्हाईट हाऊस’मधली ही
ओबामांनी दिलेली पहिलीच ’शाही मेजवानी’ होती आणि ती भारताच्या पंतप्रधानांना दिली
गेली हा केवळ योगायोग म्हणता येणार नाहीं. मग ओबामा इथे आले, भारताला संयुक्त
राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीत कायमच्या सदस्यत्वाबद्दल त्यांनी पाठिंबा दिला,
अनेक व्यापारी करार झाले, लष्करी करारही झाले किंवा होऊ घातले आहेत. थोडक्यात
अमेरिका भारताबरोबरचे मैत्रीचे संबंध वाढवायला उत्सुक दिसते आहे.

अमेरिकन धोरणातील हा बदल त्यांच्या ’हृदयपरिवर्तना’ने नक्कीच झालेला नाहीं. मग हा
बदल एक अजस्त्र बाजारपेठ काबीज करून त्याद्वारे व्यापारवृद्धी साधण्यासाठी होत आहे
कीं चीनशी भिडवण्यासाठी त्यांना आपण एक प्यादे म्हणून हवे आहे? ओबामांची कांहीं
वाक्ये बोलकी आहेत! पण त्यातलीही "Moreover, the relationship between the United
States and India is fundamentally unique -- because, as our strategy explains,
we share common interests, but we also share common values, as the world’s two
largest democracies, and as countries that are rich in diversity, with deep and
close connections among our people." ही वाक्ये अमेरिकेचा "आंतर: कोSपि हेतु:"
सांगणारी आहेत. आपल्या लोकशाहीचे कितीही पडघम ओबामा वाजवत असले तरी आशियाई देशात
शस्त्र आयातीत सध्यातरी भारत सर्वात मोठा देश आहे आणि तो नुसताच मोठा नाहीं तर नगद
पैसे मोजून शस्त्रे विकत घेणारा देश आहे. एरवी आपल्या बहुसंख्य गरजा आयात केलेल्या
मालावर भागविणारी अमेरिका स्वतः ज्या मोजक्या गोष्टी निर्मिते त्यात
शस्त्रास्त्रनिर्मिती ठळक आहे. ओबामांनी आपल्याबरोबर दोस्ती करण्यामागील
कारणांबद्दल कशीही आणि कितीही मखलाशी केली तरी त्यांचे "The United States values
our partnership not because of where India is on a map, but because of what we
share and where we can go together." हे वाक्य "ताकाला जाऊन भांडे लपविण्या"इतकेच
हास्यास्पद दिसते! कारण स्वातंत्र्य मिळाल्यापासूनच सर्वात मोठी लोकशाही आपण राबवत
आहोत हे अमेरिकेला नक्कीच माहीत होते!

थोडक्यात चीनला शह देण्यासाठी आपला उपयोग अमेरिका करू इच्छिते आहे असेच दिसते. या
उलट चीन आपलाही शत्रू असल्यामुळे आणि त्याच्या ’शहाला प्रतिशह’ देण्यासाठी आपल्याला
अमेरिकेबरोबरची मैत्री उपयुक्त असल्यामुळे चालत आलेली मैत्री आणि मदत नाकारण्याचा
मूर्खपणा आपण करता कामा नये पण आपले तारतम्यही सोडता कामा नये. कारण अमेरिकेने
पाकिस्तानचा ’अस्साच’ उपयोग करून घेतला होता आणि पुढे त्याला वार्‍यावर सोडले होते.

मी हे जे वर लिहिले आहे त्यात एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे कीं सर्वसाधारण
अमेरिकेबद्दलचा आणि अमेरिकन जनतेबद्दलचा अनुभव अतीशय चांगला आहे, पण अमेरिकन
सरकारचे वागणे फार वेगळे वाटते. असेही मानले जाते की अमेरिकेचे राष्ट्रपती जास्तीत
जास्त ८ वर्षेंच सत्तेवर राहू शकतात. त्यामुळे त्यांच्या धोरणाचा रोख आपल्या
कारकीर्दीचे मूल्यमापन कसे केले जाईल (ज्यासाठी इंग्रजीत Legacy म्हणतात) इकडेच
जास्त असते, दीर्घ मुदतीच्या अमेरिकेच्या हितसंबंधांकडे त्या मानाने कमी असते असे
मानले जाते. त्यामुळे रेगन यांनी रशियाचे तुकडे केले हेच आज लोकांच्या लक्षात आहे,
पण उद्या जर एकाद्या दहशतवादी संघटनेने अमेरिकेवर अण्वस्त्र डागले (देव करो आणि असे
न होवो) तरच रेगन यांची अनेक पातकें अमेरिकन जनतेच्या लक्षात येतील. बरेच लोक असेही
म्हणतात कीं अमेरिकन सरकारची धोरणे लोकप्रतिनिधींवर वजन आणणार्‍या लोकांचे गटच
(Lobbyists) चालवतात. हे अर्थातच सर्वच लोकशाही पद्धतीने चालणार्‍या
सरकारांच्याबाबतीत सर्वसाधारणपणे म्हणता येईल, पण कदाचित अमेरिकन सरकारच्या बाबतीत
ते जास्त लागू असावे.

शपथविधीनंतरच्या आपल्या भाषणात मुस्लिम राष्ट्रांना उद्देशून ओबामा म्हणाले होते
कीं मुस्लिम राष्ट्रांनी जर आपली अमेरिकेवर हल्ला करण्यासाठी घट्ट आवळलेली मूठ
उघडली तर त्यांना अमेरिकेचा दोस्तीचा हात समोर दिसेल. हात तर दिसतोय् पण तो
पकडायच्या आधी अमेरिका एक ’दोस्त’ म्हणून विश्वासार्ह आहे का याबद्दल विचार करून
मगच त्यांच्याशी हस्तांदोलन करणे श्रेयस्कर ठरेल कारण अमेरिका हे राष्ट्र "न इनकी
दोस्ती अच्छी ना दुष्मनी" या वर्गात मोडते. परस्पर गरजेनुसार, गरजेइतकी आणि
गरजेपुरती मैत्री जरूर करावी पण तिचे मिंधेही होऊ नये व तिच्यापासून जागरुकही
रहावे. प्रत्येक पावलानंतर सारे कांहीं ’आलबेल’ आहे ना हे तपासून पक्के करावे व मग
पुढचे पाऊल टाकावे

Monday, November 8, 2010

ओबामाची मुंबई सहल

--- ओबामाची मुंबई सहल
मिशेल ओबामा थोडी वैतागलीच होती. सगळं पॅकिंग एकटीनेच करायचं म्हणजे काय? नवर्‍याची काडीची मदत नाही. अमेरिकेचा अध्यक्ष झाल्यापासून त्याला वाटतंय आपण कोण झालो आणि कोण नाही. स्वत:ला अशोक चव्हाण समजतो. स्वत:चे शर्ट व टायदेखील स्वत: बघायचे नाहीत म्हणजे काय?
‘गरम कपडे भरपूर घेऊन ठेव हं.’ ‘उगीच इंटरेस्ट दाखवत बराकराव म्हणाले, ‘माझे लोकरीचे मोजे विसरू नकोस. मुंबईत लागतील.’
‘मुंबईत?’ मिशेल ओरडली. ‘मुंबईतील हवा भट्टीसारखी आहे. लोकरीचे सोडा, नुसते मोजेही तुम्हाला घालता येणार नाहीत. टाय वगैरे विसरा. मलमलचा झब्बा व पायजमा हेच कपडे तुम्हाला सर्वत्र घालावे लागतील. ‘ताज’मध्ये तर माझं ऐका, हाफपॅण्टवर उघडेच बसत जा. आपले सिक्युरिटीवाले सोडून कोण बघायला बसलंय?’
‘सिसावाला झब्बा घे. मोबाईल व सुटे पैसे ठेवायला बरे पडेल.’
‘सुटे पैसे म्हणजे चार आण्याचं नाणं घेऊ नका. ते नुसतंच अस्तित्वात आहे. चालत नाही. दहा पैशांचं नाणं तर मागेच गेलं.’
‘कुठे गेलं?’
‘ते तुमच्या सी.आय.ए.ला शोधून काढायला सांगा.’
‘सी.आय.ए.ला इतर महत्त्वाचे बरेच उद्योग आहेत. सध्या सासू ही कुटुंबात मोडते की नाही या गहन प्रश्‍नाची उकल करण्यात ते गढलेत.’ ओबामा मलमलचा झब्बा मापाचा आहे की नाही ते बघत म्हणाला.
‘हे काय नवीन?’
‘महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी सांगितलंय की त्यांच्या व्याख्येनुसार सासू ही कुटुंबात मोडत नाही.’
‘म्हणजे माझी आई ही आपल्या कुटुंबाचा हिस्सा नाही?’
‘आहे गं.’ ओबामा प्रेमळपणे म्हणाला, ‘पण उद्या आपल्या ‘व्हाइट हाऊस’मधील एखादी खोली तिला देण्यात आली आणि त्याबद्दल विरोधकांनी माझ्याविरुद्ध प्रचाराची राळ उडवली तर मी अशोकरावांनी घालून दिलेला पायंडा गिरवणार. एरवी तुझी आई मला माझ्या आईसारखीच आहे.’
‘तुम्ही उद्धवसाहेबांना भेटणार की राजसाहेबांना?’
‘नारायण राणेंना. त्यासाठीच मी मराठी शिकत होतो.’
‘भेटल्यासरशी कोट कसा घालायचा तेही शिकून घ्या. बावळटासारखं टाय घालणं सोडून द्या. कणकवलीत लोकप्रिय व्हाल.’
‘बिल क्लिंटन हिंदुस्थानात गाजला होता. त्याच्यापासून वागण्याच्या पद्धती शिकायला हव्यात.’ ओबामा टाय चाचपत म्हणाला.
तो ‘व्हाइट हाऊस’मधल्या प्रकरणातही गाजला होता. त्याच्या त्या वागण्याच्या पद्धती शिकून घेतल्या नाहीत म्हणजे मिळवली’ मिशेल फणकार्‍याने म्हणाली.
‘मी सुरेश कलमाडींना भेटावे अशी हिंदुस्थान सरकारची इच्छा दिसली.
‘कोण आहेत ते गृहस्थ?’
‘नो आयडिया पण त्यांच्या दाढीविषयी खूप ऐकायला मिळालं. ही सीम्स टु बी अ व्हेरी फोकसड् मॅन. दाढी वाढविण्यावर व तिची निगा राखण्यावर त्यांनी संपूर्ण लक्ष केंद्रित केलंय. आपल्याला अशा माणसांची गरज आहे, पण हिंदुस्थान त्यांची सेवा उपलब्ध करून देईल असे वाटत नाही.’
‘मला शबाना आझमीला भेटायचं होतं, पण ‘व्हिजीट टू झोपडपट्टी’ असं कार्यक्रम पत्रिकेत लिहिलेलं नसल्याने ती कुठे भेटू शकेल हेच समजत नाही.’ मिशेल विषादाने म्हणाली, ‘त्यातून तिचा नवरा कम्युनिस्ट आहे म्हणे.’
‘हिंदुस्थानातले कम्युनिस्ट म्हणजे पाणी घालून पातळ केलेले वरण. सिनेमा लायनीतले कम्युनिस्ट म्हणजे आपल्या बुशसारखे जोकर्स. ही माणसं महेश भटला ‘इंटेलेक्चुअल’ म्हणतात. आता बोल.’
‘मला कळलं की हिंदुस्थानात फार गरिबी आहे.’ मिशेल म्हणाली, ‘माणसं जमिनीवर बसून हाताने जेवतात.’
‘मी सगळी व्यवस्था केली आहे.’ ओबामा म्हणाला, ‘आपल्याला हाताने जेवता येत नाही हे त्यांना माहित्येय. म्हणून मला मनमोहन सिंगजी व तुला सोनियाजी भरवणार आहेत. एक घास काऊचा, एक घास चिऊचा असं म्हणत जेवायला घालायची त्यांची पद्धत आहे.
‘पण त्याचा अर्थ काय?’
‘मला तरी काय माहीत? जेवण हवं असेल तर रीतीभाती पाळाव्या लागतील.’
‘जेवल्यावर हात धुतात म्हणे?’
‘ते आपल्यासाठी नाही. मनमोहनजी व सोनियाजी हात धुतील.’ ओबामा हात पॅण्टच्या खिशात घालून म्हणाला.
‘दिवाळी म्हणून आपल्याला काय करावं लागेल?’ मिशेलने विचारले.
‘तू एखादी साडी विकत घे. व्यापार पेठेत घेतलीस तर स्वस्त पडेल. मी सोनियाजींना भाऊबीज घालीन.’
‘किती?’
‘जास्त नाही, दोन-पाच लाख डॉलर्स घालीन. इट्स अ टोकन गेस्चर, यू सी.’
‘आपली सुरक्षा व्यवस्था भयंकर आहे म्हणतात. आपल्याला कोणापासून धोका आहे?’ मिशेलने काळजीच्या सुरात विचारले.
‘आपल्याला कसलाही धोका नाही. पण त्यांच्या आपसातल्या मारामार्‍यात आपल्याला चुकून दुखापत होण्याची त्यांना भीती वाटते. आपण आहोत तेवढे तीन दिवस मारामार्‍या स्थगित ठेवण्याची सूचना मी केली, पण ते म्हणाले की शक्य नाही. तेरड्याचा रंग तीन दिवस, आमच्या मारामार्‍या कायमच्याच आहेत.’
‘मग तुम्ही काय म्हणालात?’
‘जय हिंद!’

Wednesday, October 20, 2010

मराठी माणसाची प्रचंड बदनामी करणारे पुस्तक

मराठी माणसाची प्रचंड बदनामी करणारे पुस्तक

इंग्लंडच्या राजपुत्रापासून ते जगभरातील कॉर्पोरेट जगताने मॅनेजमेंट गुरू म्हणून ज्यांना सलाम ठोकला ते मुंबईचे डबेवाले म्हणजे घामटलेली डुकरे आहेत, त्यांच्या घामाला डुकरासारखी दुर्गंधी येते अशी गरळ ‘सच अ लॉंग जर्नी’ या पुस्तकातून ओकणार्‍या रोहिंटन मिस्त्री याच्या विरोधात मराठमोळे डबेवाले आज मैदानात उतरले.

हाच तो हरामखोर रोहिंटन मिस्त्री

मराठी माणसांची प्रचंड बदनामी करणार्‍या त्याच्या ‘सच अ लॉंग जर्नी’ पुस्तकावर कायमची बंदी घाला अशी मागणी डबेवाल्यांच्या संघटनेने केली.
छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आणि मराठी माणसांची मुंबई हुतात्म्यांच्या रक्तातून आणि कष्टकर्‍यांच्या श्रमातून, घामातून उभी राहिली आहे. इथल्या मातीला घामाचा सुगंध आहे. हे परदेशात गार डबक्यात बसून बोरू घासणार्‍या मिस्त्रीला काय कळणार? असा सवाल रघुनाथ मेदगे यांनी केला. आम्ही मराठी आहोत आणि याचा आम्हाला नितांत अभिमान आहे. मराठी माणसाचा हा अपमान करणार्‍या
मिस्त्रीच्या या पुस्तकावर कायमची बंदी घाला. अन्यथा आंदोलनाचा भडका उडेल असा इशारा मेदगे यांनी दिला. आमच्याकडे अभ्यासाची डिग्री नाही पण जगभरातले मॅनेजमेंटचे विद्यार्थी आमच्या कामाचा, कष्टाचा अभ्यास करतात. आमच्या टाइम मॅनेजमेंटवर पीएचडी सुरू आहे. इंग्लंडचा राजपुत्र चार्ल्सने आम्हाला मानाचे पान दिले. महाराणी एलिझाबेथने इंग्लंडमध्ये बोलवून आमचा सन्मान केला.
व्हर्जिन ऍटलांटीक या जगातील नावाजलेल्या मॅनेजमेंट कंपनीचे अध्यक्ष रिचर्ड बेंन्सन यांनी आमची भेट घेऊन कौतुकाची थाप पाठीवर दिली. जगभरातील पत्रकार, मिडीयाला आमच्या कामाची भुरळ पडली आहे. हा आमच्या घामाचा गौरव आहे आणि हे जर त्या मिस्त्रीला कळत नसेल तर आग लागो त्याच्या शिक्षणाला. परदेशात बसून चिखल चिवडणार्‍या मिस्त्रीने हिंदुस्थानात येऊन दाखवावे असे आव्हानच
डबेवाला संघटनेचे चिटणीस गंगाराम तळेकर यांच्यासह बबन जाचक, रामदास जाधव, बबन वाळंज, दामोदर मेदगे या पदाधिकार्‍यांनी दिले आहे.
* मिस्त्री नाराज
दरम्यान, शिवराळ भाषा असलेले रोहिंटन मिस्त्री याचे ‘सच अ लॉंग जर्नी’ हे पुस्तक शिवसेनेच्या आंदोलनानंतर मुंबई विद्यापीठाने अभ्यासातून वगळले, मात्र विद्यापीठाचा हा निर्णय मिस्त्री याच्या पचनी पडलेला नाही. त्याने विद्यापीठाकडे या निर्णयाबाबत ई-मेलद्वारे नाराजी व्यक्त केली आहे. त्याची नाराजी व्यक्त करणार्‍या या ई-मेलची पत्रके वाटण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते आनंद
पटवर्धन यांनी विशेेष पुढाकार घेतला.
मुंबईत जन्म झालेला रोहिंटन मिस्त्री कॅनडात स्थायिक झाला आहे. 1 एप्रिल 1991 साली त्याचे ‘सच अ लॉंग जर्नी’ हे पुस्तक प्रकाशित झाले. 424 पानांचे हे पुस्तक असून 2007 मध्ये ते आर्ट्सच्या दुसर्‍या वर्षाला अभ्यासक्रमात लावण्यात आले होते. मराठी माणसांबद्दल अतिशय घृणास्पद उल्लेख असलेले हे पुस्तक 15 ते 16 महाविद्यालयांनी अभ्यासक्रमासाठी घेतले होते.

Monday, September 20, 2010

भय्यां हातपाय आवरी

भय्यां हातपाय आवरी
दीड महिन्यांत 12 हजारांनी धरला गॉंव का रास्ता

बिहार-उत्तर प्रदेशातून मुंबईवर धडकणार्‍या परप्रांतीयांचे लोंढे आवरण्यात राज्य सरकार सपशेल अपयशी ठरले असतानाच आरटीओच्या मोहिमेमुळे या उपर्‍यांना अनपेक्षितपणे जोरदार धक्का बसला आहे. जुन्या टॅक्सींना ‘नवीन बॉडी’ लावून गोलमाल करणार्‍या टॅक्सीचालकांविरुद्ध आरटीओने ‘टॅक्सी काटो’ मोहीम उघडून या टॅक्सी भंगारात फेकल्या आहेत. त्यामुळे या टॅक्सी चालविणार्‍या 12
हजार भय्यांना झटका बसला असून त्यांनी मुंबईतून ‘बोजाबिस्तरा’ आवरून ‘गॉंव का रस्ता’ धरला आहे.
मुंबईतील वाढत्या प्रदूषणामुळे 25 वर्षांपूर्वीच्या टॅक्सी चालवू नयेत असा नियम आरटीओने काढला परंतु टॅक्सीधंद्यावर कब्जा केलेल्या परप्रांतीयांनी जुन्या टॅक्सींच्या ‘चेसीज’ला नवी बॉडी चढवून आरटीओच्या डोळ्यांत धूळफेक केली. ही बनवाबनवी लक्षात आल्याने आरटीओने टॅक्सींचे परवाने रद्द करून त्या भंगारात फेकून दिल्या. गेल्या दीड महिन्यापासून सुरू असलेल्या या मोहिमेत
मुंबईतील तब्बल दीड हजार जुन्या टॅक्सी रद्द झाल्या आहेत. अडीच हजार टॅक्सींवर टांगती तलवार आहे. त्यामुळे तीन शिफ्टमध्ये या टॅक्सी चालविणार्‍या 12 हजारांहून अधिक परप्रांतीयांना झटका बसला आहे. दुसरे काम नसल्याने या उपर्‍यांनी पुन्हा थेट उत्तर प्रदेश, बिहारमधील आपल्या गावचा रस्ता धरला आहे असे दादरमधील मुलायमसिंग गुप्ता या टॅक्सीचालकाने सांगितले. ‘मुंबईत अभी टॅक्सी
का धंदा नही रहा, गाव जाकर कुछ मोलमजुरी करेंगे’ अशी प्रतिक्रिया लल्लन तिवारी या गोदान एक्स्प्रेसमधून बिहारला परत निघालेल्या टॅक्सीचालकाने व्यक्त केली.

Thursday, September 16, 2010

होय, मुंबई आम्ही विकत घेतलीय!

होय, मुंबई आम्ही विकत घेतलीय!
महाराष्ट्राने मुंबईसह स्वतंत्र राज्य म्हणून जन्माला येण्यापोटी गुजरातला चक्क कोट्यवधी रुपये मोजले आहेत, हे फारच कमीजणांच्या गावी असेल. महाराष्ट्र आणि गुजरात अशी दोन स्वतंत्र राज्ये अस्तित्वात येणार ही काळ्या दगडावरची रेघ ठरल्यानंतर राज्यघटनेच्या ७व्या व ८व्या परिशिष्टात आवश्यक सुधारणा करण्यात आल्या. कलम ४२(२), ४८(१) आणि ५१(५)अनुसार गुजरात राज्याची राजधानी
विकसित करण्यासाठी अस्तित्वात असलेल्या राज्याच्या कॅश बॅलन्स इन्व्हेस्टमेंट अकाऊंटमधून १० कोटी रुपये इतकी रक्कम देण्यात यावी असे प्रस्तावित करण्यात आले. त्यानंतर गुजरात राज्याची वाषिर्क तूट भरून काढण्यासाठी १९६० साली ६.०२ कोटी रुपयांपासून सुरुवात करून १९६९-७०पर्यंत १.१४ कोटी अशा क्रमाने रकमा द्याव्या, असे ठरले. याखेरीज १९६२-६३पासून १९६९-७०पर्यंत ८ आथिर्क
वर्षांत गुजरातला २८.३९ कोटी रुपये लाभ व्हावा असाही निर्णय झाला.


बॉम्बे रिऑर्गनायझेशन अॅक्ट १९६०च्या कलम ५२खाली महाराष्ट्राने गुजरातला १९६२-६३ साली ६१२ लाख, ६३-६४ साली ५८५ लाख, ६४-६५ साली ५०१ लाख, ६५-६६ साली ५२६ लाख, ६६-६७ साली ४३३ लाख, ६७-६८ साली ३४० लाख, १९६८-६९ साली २०९ लाख असे ३२ कोटी ६६ लाख रुपये दिले. यात नव्या तरतुदीनुसार दिलेले ३८ कोटी धरून एकूण ६० कोटी ६६ लाख रुपये महाराष्ट्राने गुजरातला दिल्याची नोंद 'द गॅझेट ऑफ इंडिया
एक्स्ट्रा ऑडिर्नरी'मध्ये आहे.

याचा अर्थ, मुंबईवरील ताबा राखण्यासाठी महाराष्ट्राला ६० कोटींची किंमत चुकवावी लागली आहे. होय, एका परीने मुंबई आपण विकत घेतलीय. भारतीय स्वातंत्र्याच्या वेळी झालेल्या फाळणीत पाकिस्तानला ५५ कोटी रुपये द्यावे लागले, त्यावरून आजही एक वर्ग सतत विखारलेला असतो. इथे तर स्वतंत्र भारतातीलच एका राज्याने दुसऱ्याला ही किंमत मोजली आहे. या मुंबईत कामगार, चाकरमानी, कारकून,
कष्टकरी आणि निर्धन बुद्धिवादी इतकीच ओळख असलेल्या मराठी माणसाला कोणताच न्यूनगंड बाळगण्याची गरज नाही. मुंबईसह महाराष्ट्र अस्तित्वात आणण्यासाठी १०६ हुतात्म्यांचे रक्त तर आपण सांडले आहेच, पण ६० कोटी ६६ लाख रुपयेही मोजले आहेत!